मुंबई : धनगर आरक्षण प्रश्नी मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवत सर्वोच्च न्यायालयाने धनगर आरक्षणा संदर्भातील याचिका फेटाळून लावली. त्यामुळे धनगर समाजात प्रचंड संताप व्यक्त होताना दिसत आहे.
धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळण्याच्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल करण्यात आलेल्या होत्या. सदरील सर्वच्या सर्व याचिका न्यायमूर्ती गौतम पटेल व न्या. कमल खाटा यांनी दि. १६ फेब्रुवारी रोजी फेटाळून लावल्या होत्या.
सदरील निर्णयाच्या विरोधात दिल्लीच्या सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमति याचिका ( क्र. १४४४६/२०२४ ) दाखल करण्यात आली होती. सदर याचिकेची सुनावणी दि १९ एप्रिल रोजी न्या. जे. के. माहेश्वरी व न्या. संजय करोत यांच्या घटनापिठासमोर झाली. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला निकाल कायम ठेवत सर्वोच्च न्यायालयाने सदरील याचिका फेटाळून लावली. त्यामुळे धनगर समाजात नाराजी व संभ्रम निर्माण झाला असून, उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
धनगर जमातीने संभ्रमित होऊ नये
धनगर ST आरक्षण विषयी टीव्ही वर दाखवण्यात येणारी बातमी ही धनगर जमातीने दाखल केलेली आपली प्रबोधन मंच ची 4919/2017 याचिका नाही. प्रबोधन मंच ने अजून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केलेली नाही. आता दाखल करता येईल का? कशी दाखल करता येईल? यावर विचार-विनिमय चालू आहे.
सुधाकर शेळके सहसचिव – महाराणी अहिल्यादेवी प्रबोधन मंच