पुणे : मावळ तालुक्यातील लोणावळा जवळ मुंबई पुणे हायवेच्या शेजारी टाकलेले अन्न मेंढ्यांनी खाल्ल्याने विषबाधा होऊन मेंढपाळ काळूराम शिवाजी बरकडे (रा. वानकुटा, ता. पारनेर, जि. नगर) यांच्या तब्बल २०० मेंढ्यांचा मृत्यू २ दिवसात झाल्याने मेंढपाळ कुटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळला आहे. यामुळे मेंढपाळचे जवळपास 25 लाखापेक्षा जास्त नुकसान झाल्याचे बोलले जात आहे.
दि २८ जानेवारी रोजी दुपारी ४ नंतर मेंढपाळ काळूराम शिवाजी बरकडे आपल्या जवळपास २०० पेक्षा जास्त मेंढ्यांचा कळप मावळ तालुक्यातील लोणावळा जवळ जेवरेवाडी शिवारात आपल्या मेंढया चारत असताना मेंढया रोडच्या कडेला पडलेल्या अन्नाच्या ढिगार्याकडे गेल्या आणि पटपट चारा समजून ते सडलेले अन्न खाऊ लागल्या. परिणामी ३ ते ४ तासानंतर करंडोली येथे रात्रीच्यावेळीच वाड्यावर टप्प्या – टप्प्याने जवळपास ११७ मेंढ्यांचा मृत्यू झाल्याने मेंढपाळांच्या वाड्यावर रात्रभर आक्रोश पाहावयास मिळाला. तर २९ जाने दुपार नंतर जवळपास ८० मेंढया मरण पावल्या आहेत. अचानक एकाएकी मेंढ्यांचा मृत्यू होऊ लागल्याने मेंढपाळालाही काही समजेनासे झाले. सकाळी मेंढपाळाच्या वाढयावरील आक्रोश पाहून संपूर्ण गाव धावून आले होते. याठिकाणी आलेला प्रत्येकजण समोरील दृश्य पाहून हळहळ व्यक्त करीत होता.
सदर घटनेचा शासनाच्या वतीने पंचनामा केला. यावेळी नायब तहसिलदार केदारी, तलाठी जाधव, मंडळ अधिकारी उज्वला पवार, पशुसंवर्धन वैद्यकीय अधिकारी सह गावचे सरपंच, पदाधिकारी यांनी येऊन भेट दिली व मेंढपाळ कुटुंबाचे सांत्वन केले व मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यानंतर जेसीबीच्या सहाय्याने सर्वच्या सर्व मेंढया पुरण्यात आल्या.