मुंबई : राज्य मागासवर्ग आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार, भटक्या विमुक्त जमाती घटकात १० तत्सम जातींचा नव्याने समावेश करण्यात आला आहे.
आरक्षण यादीत नव्या तत्सम जातींचा समावेश करण्याचा विषय गेले अनेक महिने प्रलंबित होता. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता केव्हाही लागण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर लेखानुदान अधिवेशन काळात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेतला आहे. याबाबतचा अध्यादेश लवकरच जाहिर होणार आहे.
विशेषतः धनगर समाजासाठी असलेल्या भज क या प्रवर्गामध्ये ठेलारी या मेंढपाळ जातीचा समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी ठेलारी जातीचा भटक्या जमाती ब या प्रवर्गामध्ये समावेश होता. ठेलारी ही जात धनगर या मुख्य जमातीची पोटजात आहे.
राज्य मागासवर्ग आयोगाने यासदंर्भात शासनाला शिफारस केली होती. शासनाने आयोगाच्या शिफारसी स्वीकारल्या आहेत. गेल्या १५ वर्षापासून या जमातीतील व्यक्ति, संस्था व संघटनांनी ठेलारी जातीचा भज क या प्रवर्गामध्ये समावेश करावा अशी मागणी अनेकवेळा केली होती. यासाठी धनगर समाजातील अनेक नेत्यांनीही यासाठी प्रयत्न केले होते.