मुंबई : अहमदनगर जिल्ह्याचे नाव ‘अहिल्यानगर’ असे करण्याची मागणी कित्येक दिवसांपासून होत आहे. यादरम्यान राज्य सराकराने या मागणीच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर अखेर केंद्र सरकारने देखील राज्य सरकारकडून पाठवण्यात आलेल्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी दिली आहे. राज्याचे महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याबद्दल माहिती दिली आहे.
अहिल्यानगर नामांतराची वचनपूर्ती!!!
अहमदनगर चे अहिल्यानगर नामांतर करावे यासाठी आमदार राम शिंदे यांच्यासह राज्यातील अनेक नेते, संस्था, संघटना यांनी मागणी राज्यसरकारकडे केली होती. यासाठी राज्यभरात, मोर्चे, पदयात्रा, रथयात्रा अशा अनेक प्रकारची आंदोलने करण्यात आली होती.
नगर जिल्ह्याचे नामांतर अहिल्यानगर करण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजूरी दिली. आज मंत्रीमंडळाच्या बैठकीत जिल्ह्याचे नामकरण अहिल्यानगर करण्यास मान्यता मिळाल्याने वचनपूर्ती झाल्याचा मनस्वी आनंद आहे. निर्णय होण्याकरीता सहकार्य करणारे विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेही मनापासून आभार!” अशी पोस्ट राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.
या निर्णयामुळे राज्यातील अहील्याभक्तांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे.