सांगोला : शेकापचे युवा नेते डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या पॅनलने महिला सूतगिरणीच्या निवडणुकीमध्ये बाजी मारली असून सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्या पॅनलचा सुपडा साप केला आहे. महिला सूतगिरणी निवडणुकीमध्ये शेकापने सर्वाच्या सर्व २१ जागांवर महिला उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे शेकाप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करत उत्साहात डॉ. बाबासाहेब देशमुख यांची मिरवणूक काढली.
दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीच डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी आमदार शहाजी पाटील यांच्या पॅनलचा धुव्वा उडवून शेकाप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण केले आहे.
सांगोल्यात शेकाप आणि आमदार पाटील गट हे पारंपरिक विरोधक असून विधानसभे पूर्वीच शेकाप कार्यकर्त्यांनी आमदार शहाजी बापू पाटील गटाला सूतगिरणीच्या निवडणुकीत व्हाइट वॉश दिला आहे. त्यामुळे अनेक राजकीय चमचमीत चर्चेनां उधाण आले आहे.