पुणे : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेचा आजच निकाल जाहीर झाला असून या मध्ये डॉ. श्रीकृष्ण श्रीराम सुशीर या धनगर तरुणाने दुसर्याच प्रयत्नात यशाचा झेंडा रोवला. डॉ. श्रीकृष्ण श्रीराम सुशीर याने यूपीएससी परीक्षेत देशातून १५५ वी रँक मिळवत उत्तीर्ण होण्याचा बहुमान मिळविला आहे.
जळगाव जमोद येथील सर्वसाधारण कुटुंबातील असलेल्या डॉ श्रीकृष्णची आई गृहिणी असून वडील शेती व्यवसाय करतात. श्रीराम सुशीर यांना ५ अपत्य असून त्यामध्ये ४ मुली व एकाच मुलाचा समावेश आहे. त्यापैकी श्रीकृष्ण व २ मुली डॉक्टर तर २ मुली शिक्षिका आहेत. डॉ श्रीकृष्णचे प्राथमिक शिक्षण न्यू इरा हायस्कूल जळगाव जामोद येथे झाले, तसेच उच्च माध्यमिक शिक्षण अकोला येथे तर वैद्यकीय शिक्षण नागपुर येथे घेतले. सर्वसाधारण कुटुंबातील असल्याची जाणीव ठेवत डॉ श्रीकृष्णने अहोरात्र परिश्रम घेतले. त्याने दुसर्याच प्रयत्नात केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन डायरेक्ट आयएएस होण्याचा मान मिळविला आहे. त्याच्या यशाने केवळ जिल्ह्याच्या नव्हे तर महाराष्ट्राच्या व धनगर समाजाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. धनगर माझा परिवाराच्या वतीने संपादक धनंजय तानले यांनी अभिनंदन केले आहे.