पुणे : अहमदनगर शहराचे नामांतर अहिल्यानगर केले पण तालुका व जिल्ह्याचे नामांतर कधी करणार असा प्रश्न राज्यातून विचारला जात आहे. गेल्या अनेक वर्षापासून धनगर समाजासह राज्यातील अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी अहमदनगरचे नामांतर अहिल्यानगर करावे अशी मागणी केली होती. यासाठी राज्यातील अनेक व्यक्ती, संस्था व संघटना यांनी शेकडो आंदोलने, मोर्चे काढले होते.
या मागणीला दुजोरा देत सरकारने दिनांक 4 ऑक्टोबर रोजी सर्व प्रक्रिया पूर्ण करत शासन आदेश काढला पण या आदेशामध्ये असे स्पष्ट लिहिले आहे की, अहमदनगर, तालुका व जिल्हा अहमदनगर महाराष्ट्र राज्य या शहराचे नाव बदपुलून ते अहिल्यानगर तालुका व जिल्हा अहमदनगर असे करण्यात यावे. म्हणजे अहमदनगर शहराचे नामांतर अहिल्यानगर केले पण या शहराचा तालुका व जिल्हा लिहताना अहमदनगर च लिहावे लागणार असे स्पष्ट होत आहे.
खरंतर अहमदनगर शहराचे नामांतर अहिल्यानगर केल्यावर तालुका व जिल्हा अहिल्यानगर च होणे अपेक्षित होते. पण सरकारने निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अहिल्यानगर तालुका व जिल्हा अहमदनगर असे करण्यात यावे असा आदेश काढल्याने संताप व्यक्त होताना दिसून येत आहे. सरकारने कदाचित निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मुस्लिम मतासाठी अहिल्यानगर नामांतर प्रकरणात तालुका व जिल्हा अहमदनगर ठेवून खुट्टा मारल्याचे दिसून येत आहे.
औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर व उस्मानाबादचे धाराशीव नामांतर केल्यानंतर त्यांचा तालुका व जिल्हा बदलू शकतो तर मग अहिल्यानगरचा तालुका व जिल्हा का बदलू शकत नाही? असा सवाल विचारला जात आहे.