म्हसवड : मानदेशामध्ये मेंढपाळाच्या वाड्यावर लांडग्याच्या कळपाने हल्ला केल्याने १९ मेंढ्यांच्या पिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यामुळे मेंढपाळांचे प्रचंड नुकसान झाले. तरी शासनाच्या वतीने त्वरित कार्यवाहीकरून पीडित मेंढपाळाला तात्काळ मदत करावी अशी मागणी डॉ. प्रमोद गावडे यांनी केली आहे.
लाडेवाडी तालुका म्हसवड शिवारामध्ये मेंढपाळ सुखदेव खताळ यांचा मेंढ्यांचा वाडा आहे. मेंढ्या चरायला घेऊन गेले असता दुपारच्या वेळी लांडग्याच्या कळपाने वाड्यावर असलेल्या १९ पिलांवर हल्ला केला. त्यामुळे ते जागीच मरण पावले आहेत. यामुळे मेंढपाळाचे प्रचंड नुकसान झाले आहे .
माजी नगराध्यक्ष तुषार वीरकर, डॉ. प्रमोद गावडे व सहकार्यांनी घटनास्थळी भेट देऊन मेंढपाळाशी संवाद साधून वनविभागाच्या अधिकार्यांना लवकरात लवकर कारवाई करून मेंढपाळला मदत देण्याची मागणी केली. सदर घटनेचा वन विभागामार्फत पंचनामा झाला असून अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर मेंढपाळाला मदत नोंद देण्याचे आश्वासन दिले आहे.