महाराष्ट्रआदर्श राजकारणातील ध्रुवतारा कै. भाई गणपतराव देशमुख - प्रा. डॉ. श्रीकांत कोकरे

आदर्श राजकारणातील ध्रुवतारा कै. भाई गणपतराव देशमुख – प्रा. डॉ. श्रीकांत कोकरे

spot_img

सांगोला :स्वर्गीय आमदार भाई गणपतराव देशमुख हे आदर्श राजकारणातील ध्रुवतारा व राजऋषी होते.त्यांची निष्ठा,सचोटी व उच्च नैतिकता ही विश्वविक्रमी होती. त्यांच्या जीवनावरील प्रा.डॉ.किसन माने यांनी लिहिलेला ‘ राजकीय मानदंड : भाई गणपतराव देशमुख ‘ हा चरित्रग्रंथ खूपच अभ्यासपूर्ण व नव्या पिढीला दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरणारा आहे. मुखपृष्ठापासून – मलपृष्ठापर्यंत हा ग्रंथ सर्वांग सुंदर साकारला आहे. प्रकरणांची शीर्षके फारच सुंदर असून,भाषाशैलीही मनमोहक आहे. आबासाहेबांच्या विधानसभेतील भाषणांचा, प्रचारसभांतील अनेक भाषणांचा  संग्रह पुस्तक रूपाने येणे काळाची गरज आहे. असे विचार सुप्रसिद्ध साहित्यिक व शास्त्रज्ञ प्रा. डॉ. श्रीकांत कोकरे (जत )यांनी व्यक्त केले.

        उदनवाडी येथील महात्मा फुले सार्वजनिक वाचनालयाने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त दिनांक २५ फेब्रुवारी, २०२४ रोजी प्रा.डॉ.किसन माने लिखित ‘राजकीय मानदंड : भाई गणपतराव देशमुख ‘या चरित्र ग्रंथावर आयोजित परिसंवादात  प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डॉ. श्रीकांत कोकरे बोलत होते. यावेळी परिसंवादात प्रमुख वक्ते म्हणून  प्रा. डॉ. वामन जाधव (पंढरपूर ), प्रा. मुकुंद वलेकर, कवी शिवाजी बंडगर हे सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष माजी प्राचार्य विठ्ठल वलेकर हे होते.

         प्रा.डॉ. श्रीकांत कोकरे पुढे म्हणाले की, स्वर्गीय आबासाहेबांची भाषणे व आठवणी ऑडिओ बुक रूपानेही यायला हव्यात. जनमनातील आबासाहेबांच्या मोठ्या प्रमाणातील आठवणी पुस्तक रूपाने येण्यासाठी प्रयत्न करायला हवा.

       प्रा. डॉ. वामन जाधव म्हणाले, नव्या पिढीत सोलापूर जिल्ह्यामध्ये ताकदीचा चरित्रकार म्हणून प्रा.डॉ.किसन माने यांच्याकडे पाहावे लागते. इतिहास, तत्त्वज्ञान व राजकारणाचा अभ्यास करताना डॉ.माने लिखित चरित्र ग्रंथाकडे पाहावे लागते. सत्ता ही सेवेसाठी व समाज परिवर्तनासाठी असते.सत्ता भोगासाठी नसते, हे आबासाहेबांनी आपल्या आदर्श वर्तनाने दाखवून दिले. आज राजकारणात नैतिकतेचा अंधार दाटत असताना डॉ. किसन माने यांनी स्वर्गीय आमदार गणपतराव देशमुख यांच्या चरित्राने प्रकाशाची पणती लोकांच्या पुढे ठेवली आहे. जातिभेदाच्या पलीकडे जाऊन काम करणाऱ्या आबासाहेबांचे चरित्र नव्या पिढीला दिशादर्शक व मार्गदर्शक नक्कीच आहे. आबासाहेबांची उच्च नैतिकता आज दुर्मिळ झाली आहे. आज गावोगावी आबासाहेबांच्या चरित्रग्रंथाची पारायणे व्हायला हवीत.

       कवी शिवाजी बंडगर म्हणाले, अनेक विषयांतून आबासाहेबांचे व्यक्तिमत्व नव्याने साकारता येईल.  आबासाहेबांवर नवे संशोधन व्हावे, ही प्रेरणा या चरित्रग्रंथातून मिळते. आबासाहेबांचे आचार आणि विचार तळागाळात पोहोचविण्याचे काम डॉ.किसन माने यांनी छान केले आहे.

        प्रा. मुकुंद वलेकर म्हणाले, शेतकरी कामगार पक्षाचे नेते म्हणून आयुष्य वेचलेल्या दाजिबा देसाई, कृष्णराव धुळप, प्रा. एन.डी. पाटील, एस.एम.पाटील,  आ. जयंत पाटील यांचे जीवनकार्य पुस्तक रूपाने येणे आज नव्या पिढीसाठी नितांत गरजेचे आहे. त्याशिवाय नव्या पिढीला त्यांचे जगणे – भोगणे कळणार नाही. स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या संस्मरणीय आठवणी सांगोला तालुक्यासह महाराष्ट्रातील जुन्या – जाणत्या माणसांकडून

 लिखित व ऑडिओ- व्हिडिओ रूपात संकलित करण्याची गरज आहे.आठवणींतून आबासाहेबांचे मोठेपण नव्या पिढीपुढे अमूल्य ठेवा म्हणून ठेवता येईल.आबासाहेबांचे प्रेरणादायी चरित्र देशभर व जगभर पोहोचविण्यासाठी डॉ. किसन माने यांनी लिहिलेल्या मौलिक चरित्रग्रंथाची जगातील अनेक भाषांमध्ये भाषांतरे होणे गरजेचे आहे.

      अध्यक्षीय मार्गदर्शनात   माजी प्राचार्य विठ्ठल वलेकर म्हणाले, स्वर्गीय आबासाहेबांचे कार्य महासागरासारखे आहे.सांगोला तालुक्याचा पाणी प्रश्न सोडवून आबासाहेबांनी दुष्काळात जन्मलो असलो तरी दुष्काळात मरणार नाही,ही प्रतिज्ञा खरी करून दाखविली. आबासाहेबांचे कार्यकर्त्यांवर फार बारीक लक्ष होते. डॉ. किसन माने यांनी आबासाहेबांचे कार्य ऐतिहासिक दस्तऐवज म्हणून चरित्रग्रंथाच्या रूपाने छान मांडले आहे.

      स्वागत,प्रास्ताविक व सूत्रसंचालन दिगंबर पांढरे यांनी केले. प्रतिमा पूजन व दीप प्रज्ज्वलन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. डॉ. किसन माने यांनी आपल्या मनोगतातून चरित्र लेखनामागची भूमिका स्पष्ट केली. अमोल वलेकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाला स्वर्गीय आबासाहेबांवर प्रेम करणारे सांगोला तालुक्यातील अनेक मान्यवर, महिला व उदनवाडी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी सौ. चिंगूताई वलेकर, सुहास वलेकर,ग्रंथपाल विजय वलेकर, सौ. लक्ष्मी टिंगरे यांनी विशेष परिश्रम घेतले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

श्री. डी.सी. डुकरे सर यांना २०२४ चा राज्यस्तरीय लोकराजा शाहू आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

परभणी : मागील तीस वर्षांपासून इंग्रजी विषयाचे अध्यापन करणारे अभ्यासू अध्यापक तथा राष्ट्रमाता इंदिरा...

धनगर समाजाला मंत्रीमंडळात प्रतिनिधित्व मिळावे देण्याची मागणी

नाशिक : धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी व विशेषतः धनगर समाजाला मंत्रीमंडळात प्रतिनिधित्व मिळावे या...

मा. मंत्री आण्णासाहेब डांगे यांचे सुपुत्र सर्जेराव डांगे यांचे दुःखद निधन

इस्लामपूर : येथील सर्जेराव रामचंद्र डांगे (दादा) यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले...

महाराजा यशवंतराव होळकर यांचा २४९ वा जयंती सोहळा उत्साहात साजरा…

पुणे: महाराजा यशवंतराव होळकर यांचा २४९ वा जयंती सोहळा वाफगाव या त्यांच्या जन्मगावी अहिल्यारत्न...