पुणे : तब्बल ६ दशकानंतर धनगर समाजाचा प्रतिनिधी लोकसभेत पाठविण्याची नामी संधी राष्ट्रीय समाज पक्षाचे आ. महादेव जानकर यांच्या माध्यमातून महायुतीने दिल्याने परभणी लोकसभा मतदार संघासह राज्यातील तमाम धनगर समाजाने महादेव जानकर यांना तन मन धनाने मदत करून लोकसभेत पाठविण्याचा संकल्प गुढी पाडव्याच्या निमित्ताने करावा असे आवाहन धनगर माझा परिवाराच्या वतीने संपादक धनंजय तानले यांनी केले आहे.
यापूर्वीहि अनेकवेळा लोकसभेच्या निवडणुका झाल्या. आ. महादेव जानकर सह अनेक लोकांनी लोकसभेत जाण्यासाठी खूप प्रयत्न केले पण यश आले नाही. पण यावेळी परस्थिती वेगळी आहे. या देशातील प्रमुख आणि बलाढ्य असलेल्या भारतीय जनता पार्टी, सह राज्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना या सत्ताधारी पक्षाच्या महायुतीने आ. महादेव जानकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीच्या नेते, कार्यकर्त्यांसह धनगर समाजाने साथ दिली, तरच जानकर निवडून येऊ शकतात.
महादेव जानकर येथे महायुतीचे उमेदवार आहेत. मात्र जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाचे या जिल्ह्यात म्हणावे तेवढे प्राबल्य नाही. त्यांचा हा पक्ष सर्वदूर पोहोचलेला नाही. दुसरी गोष्ट म्हणजे जानकर यांच्या पक्षाचा तरुण, शेतकरी, व्यापारी वर्गामध्ये जनसंपर्क नाही. त्याचाही फटका जानकर यांना बसू शकतो. परिणामी याची कसर धनगर समाजातील बुद्धिजीवी, राजकीय, सामाजिक, चळवळतील कार्यकर्त्यांनी मेहनत घेवून भरून काढणे गरजेचे आहे.
धनगर समाजातील अनेक अधिकारी, कर्मचारी, उद्योजक, सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांनी समाजाचा पक्ष किंवा आपला माणूस किंवा सामाजिक योगदान म्हणून महादेव जानकर यांना तनमनधनाने मदत करावी. केलेली मदत वाया जाणार नाही आणि आ. महादेव जानकर या संधीचे सोनं केल्याशिवाय राहणार नाहीत याची आम्हाला खात्री आहे.