१६मार्च १६९३ या दिवशी सातारा जिल्ह्यात नीरेच्या थडी होळ गावी देशगावडा कुटुंबात मल्हारराव होळकर यांचा जन्म झाला. हेच मल्हारराव होळकर आपल्या अंगच्या असलेल्या मुत्सदीपणाच्या जोरावर आणि हाती असलेल्या तलवारीच्या बळावर अठराव्या शतकातील मराठेशाहीच्या इतिहासात अजरामर झाले. मग ती पालखेडची लढाई असो, वसईची मोहीम असो, भोपाळची मोहीम असो, दिल्लीची मोहीम असो, अटकेपारची मोहीम असो, राक्षसभुवनची लढाई असो किंवा अमावस्या असलेल्या सूर्यग्रहणाच्या दिवशी बुंदीची केलेली मोहीम असो. अशा कितीतरी मोहिमा मल्हारराव होळकरांच्या पराक्रमाशिवाय अपूर्ण आहेत. याशिवाय पानिपत महासंग्रामात मल्हारराव होळकरांचा तेवढाच मोठा सहभाग होता. परकीय अब्दालीबरोबर मराठ्यांचा संघर्ष झाला. या संघर्षात मराठ्यांची पुष्कळशी हानी झाली. या संग्रामात जसा अब्दाली हा मराठ्यांसाठी खलनायक होता, तसाच रोहीलखंडातील नजीबखान रोहिला हा मराठ्यांसाठी खलनायक ठरला. हाच नजीब मल्हारराव होळकर यांना आपला धर्मपिता मानायचा असा काही इतिहासकारांचा सूर आहे. हे कितपत योग्य आहे याबाबत संदर्भासहित केलेला हा लेखप्रपंच.

सर्वात अगोदर आपण जे इतिहासकार मल्हारराव होळकर यांना दोष देऊ इच्छितात त्यांना इतिहासकार शेजवलकर काय सांगतात ते पाहू.
‘हे इतिहासकार मल्हाररावांची संबंध आयुष्यभर असलेली मनोरचना व वागण्याची रीत लक्षात घेतल्याशिवाय बोलतात! मल्हारराव हे इतर बहुतेक मराठ्यांप्रमाणे वास्तववादी होते. कल्पनारम्य सृष्टीत विहार करणारे ते नव्हते. राजकारणात कोणी सदैव शत्रू किंवा सदैव मित्र असू शकत नाही अशा मनाचे मल्हारराव असल्यामुळे त्यांची वागणूक तशी होत असे, आपल्या एकुलत्या एक मुलास ठार करणाऱ्या सुरजमलशी त्यांनी केव्हा स्नेह तर केव्हा शत्रुत्व केले व गाजीउद्दीन यांच्याशी त्यांची याच जातीची वर्तणूक होती. पानिपतच्या लढाईत विरुद्ध बाजूने लढलेल्या शुजासाठीही त्यांनी पुढे इंग्रजांविरुद्ध मदत केली. वाईट माणूस सदाच वाईट राहतो किंवा चांगला माणूस कधीच वाईट होत नाही असे त्यांना वाटत नसायचे.’
अठराव्या शतकात शिंदे- होळकरांच्या बळावर मराठा साम्राज्य विस्तारत १७५८ साली मल्हारराव होळकर व रघुनाथराव तर अटकेपार झाले. मराठ्यांचे उत्तरेत वाढलेले वर्चस्व कित्येक जणांना सहन होईना. या मराठ्यांच्या वाढत्या वर्चस्वाला आता फक्त अफगाणिस्तानचा बादशहाच आळा घालू शकतो असे त्यांचे मत बनले. त्यामुळे त्याने हिंदुस्थानात येऊन मराठ्यांचा बिमोड करावा यासाठी अनेक जण अब्दालीस निमंत्रण देण्यासाठी पुढे सरसावले. त्यांनी त्याच्याबरोबर पत्र व्यवहार सुरू केला.
यामध्ये मुस्लिम धर्मगुरू वल्लीउल्ला, मुघलानी बेगम, मालिका ए जमानी ,रजपुतराजे माधोसिंग, विजयसिंग व रोहीलखंडाचा सर्वेसर्वा नजीबखान रोहिला होता. याच नजीबखानाची मराठ्यांच्या इतिहासात कली,मात्रागमनी या उपमाने ओळख आहे. हा नजीब खरोखरच कपटी व धूर्त होता. आपला स्वार्थ साधण्यासाठी त्याची वाटेल ती करायची तयारी असायची. संकट समयी शत्रूबरोबर तो मुलगा, भाऊ, मेहुणा यासारखे नातेसंबंध जोडायचा.
उत्तरेत मराठ्यांची आपल्यावरील मर्जी कमी होऊ नये म्हणून मराठा सरदार गोविंदपंत बुंदेले यास तो दाजी म्हणत असे. गोविंदपंतांच्या स्त्रीस तो बहीण मानत असे.
ऑगस्ट १७५७ मध्ये मल्हारराव होळकर व रघुनाथाने दिल्लीवर हमला केला. यावेळी अब्दालीच्या वतीने दिल्लीवर नजीबाचे वर्चस्व होते. मराठ्यांकडून नजीब घेरला गेला. धूर्त नजीब संकटात सापडल्यानंतर तो मल्हाररावांच्या छावणीत बोलणी करण्यासाठी गेला. ‘मी तुमचा धर्मपुत्र आहे तुम्ही मजवर तलवार बांधावी. ही गोष्ट उत्तम नाही. मी अब्दालीकडे जाऊन तुमचा व त्याचा कायमचा तह करून देईल. उभयंताची सीमा ठरून देईन. माझा मुलगा झाबेतखान तुमच्याजवळ पाच सात हजार सैन्यासोबत ठेवीन. म्हणून मजविषयी तुमच्या मनात संशय राहू नये.’
हा प्रस्ताव मल्हाररावाने तात्काळ धुडकावून लावला. याउलट त्याने दिल्लीचा ताबा सोडून तात्काळ आपल्या सरहानपूरच्या जहागिरीकडे निघून जावे. हा मल्हाररावाने नजीबास दमच दिला. त्याला दिल्लीतून हाकलून लाविले. हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे.
एवढेच नाही तर अब्दालीच्या साह्याने नजीबखानाने अंतरवेदीतील जी ठाणी कब्जात घेतली होती, ती सारी ठाणी मल्हारराव होळकरांनी विठ्ठल शिवदेव, मानाजी पायगुडे या मराठा सरदारांना बरोबर घेऊन तलवारीच्या बळावर मराठ्यांच्या ताब्यात आणली. मल्हारराव होळकरांच्या सोबत या मोहिमेत सहभागी असलेले रघुनाथराव जरी गडमुक्तेश्वरी येथे तीर्थ स्नानासाठी गेले होते, तरी इकडे दुआबात मल्हारराव होळकरांनी मराठ्यांचा अंमल बसविला. मल्हाररावांच्या आक्रमणामुळे नजीबच्या लोकांनी सरहानपूरच्या जहागिरीतून पलायन केले.
या साऱ्या घटना पाहता मात्र आपल्या इतिहासकारांनी मल्हारराव व नजीब या दोघांमध्ये नसलेल्या धर्मपिता- धर्मपुत्राच्या नात्याचा फार बाऊ केलेला दिसतो. असे काही असते तर कुठल्या धर्मपित्याला आपल्या मुलाच्या ताब्यात दिल्ली आहे हे आवडले नसते. किंवा कुठल्या पित्याने आपल्या धर्मपुत्राचा मुलुख लुटला असता, आपल्या ताब्यात घेतला असता.
आता आपण मल्हारराव होळकर, नजीबखान व अब्दालीच्या एकमेकांशीच्या संबंधाने लिहिले गेलेले काही पत्रे पाहू. अब्दाली हिंदुस्थानात आल्यानंतर व दत्ताजी शिंदे यांचा मृत्यू बुराडी घाटाच्या लढाईत झाल्यानंतर मल्हारराव होळकर पेशव्याला पत्र लिहून कळवतात.’… आमच्या जाण्यामुळे माधोसिंग थंडेसे झाले. गीलच्याचे सूत्र लावले आहे. त्याजला इकडे यावयासी मोठे अनुमोदन नजीबखान, माधोसिंग उभयंताचेच आहे.’
याचाच अर्थ अब्दाली हिंदुस्थानात माधोसिंग व नजीबखानाच्या मुळेच आला आहे. मल्हाररावांचे नजीबखानावर पुत्रवत प्रेम असते तर पेशव्याला लिहिलेल्या पत्रात मल्हाररावानी नजीबाविरुद्ध असा रोष व्यक्त केला असता का?
उत्तरेतील घडामोडींची अचूक माहिती पेशव्यांना कळवणारा मुघल दरबारातील राजा केशवराव पेशव्यांना मल्हाररावाचा अब्दालीविरुद्ध लढण्याचा बेत कसा आहे ते पुढील पत्रातून कळवतो,
‘राजश्री मल्हारराऊ पोख्ती तजवीज्य केली की अब्दालीसी जुज करायचा काबू नाही, त्याचा मुलुक जाऊन मारावा. मग अब्दाली व नजीबखान रोहिला आपले मुलुक राखायास येईल. तरी आम्ही दुसरीकडे निघोन जाऊ. हे करोन नीट त्याचे तोंडावरोन निघोन दिल्लीकडे येऊन येमुना तरोण सिकंदराबाद अंतरवेदीस ठाणे नजीबखानाचे मारून लुटून पुढे गंगेअलीकडील त्याचा मुलुख मारीताती.’
म्हणजे गनिमीकाव्याने अब्दाली व नजीबखानास हुलकावणी देत शेवटी नजीबखानाचा मुलुख मारायचा मल्हारराव होळकरांचा बेत होता.
जे इतिहासकार मल्हाररावांचे नजीबावर पोटच्या पोरासारखे प्रेम होते असे दाखवतात त्यांना हे पत्र वाचावेसे वाटले नाही का?
मार्च १७६० मध्ये नजीबखानाने अब्दाली करिता दहा लाख रुपये पाठवले असल्याचे बातमी मल्हारराव होळकरांना समजताच ती रक्कम अडविण्याच्या उद्देशाने मल्हाररावांची नजीबखानाच्या फौजेबरोबर सिकंदराबाद येथे फार मोठी लढाई झाली. या लढाईत मल्हारराव होळकर यांचे आनंदराव जाधव, शेट्याजी खराडे, त्याचा मुलगा फकीरजी असे कित्येक सरदार मृत्युमुखी पडले. ही घटना बरेच काही सांगून जाते.
नजीब खानाशिवाय जयपूरचा रजपुतराजा की जो मल्हारावामुळेच जयपुर राजगादीवर बसू शकला त्या माधोसिंगाचाही अब्दालीने हिंदुस्थानात येऊन मराठ्यांची जिरवावी असा हट्ट होता.
त्या माधोसिंगास अब्दाली पत्र लिहितो, ‘.. तू निश्चिंत राहून मल्हारला शासन कर, म्हणजे तो निसटून जाणार नाही तुला याचा मोबदलाच मिळेल.’
१७६० मधल्या मार्चच्या सुरुवातीला असेच अब्दालीने माधोसिंगास एक पत्र लिहिले,’.. दुष्टांचा असा नायनाट करीन की पुन्हा कोणीही डोकं वर करणार नाही मल्हारच म्हणशील तर त्याचीही गय करणार नाही.’
दुसऱ्या आणखी एका पत्रात अब्दाली माधोसिंगास लिहितो, ‘मल्हार तुझ्या प्रदेशात आला तर त्याला निसटू देऊ नकोस.’
या साऱ्या पत्रातून असे लक्षात येते की अब्दाली मराठ्यातून मल्हारराव होळकरांस एक नंबरचा वैरी समजत होता .याच अब्दालीचे हिंदुस्थानच्या राजकारणात नजीबाशिवाय पान हलत नव्हते.मग मल्हारराव व नजीबात मानलेल्या पिता पुत्राचे संबंध असते तर नजीबाने अब्दालीस आपला धर्मपिता मल्हाररावांबाबत मृदु भावना ठेवण्यास सांगितले नसते का?
मग असे प्रश्न इतिहास वाचकाना का पडू नयेत?
म्हटले जाते दिल्लीवर हमला करते वेळेसच नजीब कायमचा संपवायचा होता. परंतु मल्हाररावांच्या आंधळ्या प्रेमामुळे त्याची सुटका झाली आणि दोन अडीच वर्षातच नजीबाने पानिपत घडून आणले. या लढाईत मराठ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते.
या प्रसंगाला अनुसरून गो.स. सरदेसाई इतिहासकार नमूद करतात,’ वास्तविक पुढील परिणामावरून मागील घडामोडीचा बरे वाईटपणा ठरविणे इष्ट नाही.’
खरे तर या प्रसंगानंतर एक ते दोन वर्षातच असेच काही समांतर प्रसंग मराठ्यांच्या इतिहासात घडले.
सन १७५८साली मल्हारराव होळकर अटकेच्या मोहिमेवर असताना सरहिंद मध्ये अब्दालीचे सरदार अब्दुलसमदखान व जंगबाजखान यांनी मराठा होळकर स्त्रियांना कुरुक्षेत्र यात्रेवर असताना शहाबाद येथे कैद केले होते, त्यावेळी मल्हारराव होळकर यांच्या फौजेने बऱ्याच अफगानाना कापून काढून त्या स्त्रियांची सुटका केली. या लढाईत खरे तर जखमाने रक्तबंबाळ झालेल्या अब्दुससम्मदखान व जंगबाजखानास ठारच करावयास हवे होते, परंतु रघुनाथरावांनी त्यांना अभय दिले. पुढील काही राजकारणापायी वस्त्रे भूषणे देऊन त्यांचा सन्मान केला.
पुढे याच अब्दुसस्समदखाना बरोबर पानिपत मोहिमेवर असताना होळकर शिंदे यांना कुंजपुरा येथे मोठी लढाई करावी लागली.
उत्तरेच्या मोहिमेवर असताना दत्ताजी शिंदेना नजीबच्या मदतीने गंगापार करून पूर्वेकडे जायचे होते. याच मसलतीसाठी दत्ताजीने नजीबला शामलीच्या छावणीत भेटायला बोलावले. या कावेबाज नजिबाला आल्या आल्या जेरबंद करण्याचा काही सरदरांचा डाव होता. नजीबला याचा सुगावा लागताच तो दत्ताजीच्या तंबूत येऊनही ‘हे लोक भले नाहीत यांना भेटण्यात धोका आहे’असे म्हणत तो घाईघाईने बाहेर पडला. मग दत्ताजीनेही नजीबला पकडण्याचा प्रयत्न केला नाही. याप्रसंगी दत्ताजीही नजिबाला कैद करू शकले असते किंवा ठार करू शकले असते मात्र येथे एक प्रकारे मल्हारावांचीच पुनरावृत्ती दत्ताजी कडून झाली असे म्हणावे लागेल. सापाच्या शेपटीवर पाय पडल्यानंतर सापाने त्वेषाने फुत्कार काढावा तसा इथून पुढे नजीब माराठ्यांबाबत चवताळला.
प्रत्यक्ष पानिपत युद्धापूर्वी कुंजपुरा येथे दत्ताजी शिंदेचा वध करणाऱ्या कुतुबशहाला ठार करण्यापूर्वी मल्हारराव होळकर व खुद्द जनकोजी शिंदे हे सदाशिवराव भाऊला बोलले, ‘याला वाचून याची हातून महत्कार्य संपादून घ्यावे. यास् मारलियास दत्ताजी शिंदे काही उठत नाहीत.’
शेवटी इतिहासात होऊन गेलेली महान व्यक्तिमत्वे जे की आजही आमच्यासाठी स्फूर्तीस्थाने आहेत .मात्र त्यांनाही मानवी स्वभावाच्या मर्यादा होत्या, हे आम्ही विसरता कामा नये. त्या त्या वेळी उद्भवलेल्या स्थितीनुसार घेतलेल्या निर्णयाचा संबंध भविष्यातील बऱ्या वाईट घटनेशी जोडून व तिचा उहापोह करून एखाद्या कार्यात प्रचंड योगदान असणाऱ्या ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाची प्रतिमा डागाळने चुकीचेच.
मल्हारराव होळकरांच्या स्वभावाचे पैलू उघडताना इतिहासाचे भाष्यकार द.वि.आपटे सांगतात,’मल्हारराव होळकर यांच्याबाबत काही इतिहासकारांनी काही प्रमाणात का होईना अपसमज पसरविला आहे. तो चुकीचा असून मराठ्यांचे राज्य वाढावे ही गोष्ट होळकरांना पूर्णपणे मान्य होती. मल्हारराव होळकरांच्या मनात बराच सत्यांश असे. पेशवाईत मराठ्यांचे राज्य वाढून त्यास साम्राज्याचे स्वरूप प्राप्त होण्यास ज्या कर्त्या घराण्याचे परिश्रम उपयोगी पडली त्यात होळकर घराण्याची गणना प्रामुख्याने केली पाहिजे.’
एक तत्कालीन निजाम दरबारातील फ्रेंच सेनानी बुसी नमूद करतो की, ‘मल्हारराव होळकर यांची स्तुती करताना मी म्हणू शकतो की देशात दुर्मिळ असलेली असामान्य प्रामाणिकता मल्हारराव होळकर यांच्याकडे होती.’
तर ब्रिटिश इतिहासकार विल्यम इर्विन नमूद करतो की ‘मल्हारराव होळकर सत्तेच्या शिखरावर असतानाही पेशव्यांशी शेवटपर्यंत एकनिष्ठ राहिले.’
कर्नल टॉड हा ब्रिटिश इतिहासकार म्हणतो की ‘अठराव्या शतकातील उच्चराजनैतिक गुण असलेला मराठा योद्धा म्हणजे मल्हारराव होळकर होय’
या लेखातील उल्लेख केलेल्या इतिहासकाराचे मते पाहता व काही घटनाक्रम पाहता मल्हारराव होळकर व नजीब यांच्यामधील कपोकल्पित धर्मपिता -पुत्राचे नाते पूर्वग्रहदूषितपणा मनी ठेवून इतिहासात मांडले आहे, असे स्पष्ट होते.
मराठ्यांच्या इतिहासात मल्हारराव होळकर यांचे असलेले अपूर्व योगदान याविषयी उहापोह होण्याऐवजी त्यांच्याविषयी भ्रामक समजूतीच जास्त मांडल्या गेल्या. म्हणून त्यांच्या जयंतीनिमित्त मांडलेली ही दुसरी बाजू.
नजन लक्ष्मण, पाटोदा बीड . 8275386742