फलटण: राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री आ.महादेव जानकर माढा मतदारसंघातून दंड थोपटणार आहेत. यासाठी रासपकडून १७ फेब्रुवारीला माढा विजय निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, जानकरांच्या नेतृत्वात जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. १७ फेब्रुवारीला माण तालु्क्यातील शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाला अभिषेक घालून दर्शन घेऊन जानकर यांच्या नेतृत्वात भव्य रॅली काढण्यात येणार आहे. ही रॅली शिंगणापूर – कोथळे – जावली – मिरडे – नाईकबोमवाडी – वडले – सोनवडी – सोनवडी बुद्रुक – कोळकीमार्गे फलटण शहरातून मेळाव्याच्या ठिकाणी मंगल कार्यालय येथे दुपारी एक वाजता दाखल होणार आहे.
महादेव जानकर हे माढ्यातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याने पक्षाकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. काहीही करून माढा मतदारसंघ जिंकायचाच यासाठी रासपकडून माढा मतदारसंघात घोंगडी बैठकांचा धडाका सुरू करण्यात आला आहे. या बैठकांना जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत असून, विद्ममान खासदारांचे मतदारसंघातील जनतेला दर्शनदेखील दुर्लभ झाले आहे. मतदारसंघात पाण्यासह उद्योग, रोजगार, शेतकऱ्यांचे प्रश्न अशा असंख्य समस्या असल्याचे घोंगडी बैठकीत मतदारांकडून व्यक्त केल्या जात आहेत. त्यामुळे या खासदाराला आता घरी पाठवण्यासाठी आणि मतदारसंघांचे निस्वार्थी भावनेने प्रश्न सोडवण्यासाठी माढा विजय निर्धार मेळ्यावत बहुसंख्येने उपस्थिती लावावी, असे आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश महासचिव ज्ञानेश्वर सलगर…. यांनी केले आहे. जानकर काय बोलणार याकडे लक्ष ?रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी आगामी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्धार केला आहे. राज्यातील ४८ जागांवर रासपचे उमेदवार दिसून येतील, तर स्वत: महादेव जानकर हे माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. यासाठी १७ तारखेच्या माढा विजय निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, या मेळाव्यात जानकर हे निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहेत.