शिर्डी : उच्चशिक्षितांनी समाजाच्या प्रश्नांविषयी सक्रिय भूमिका घ्यावी असे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांनी केले आहे. ते शिर्डी येथे झालेल्या धनगर प्राध्यापक महासंघाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय अधिवेशनात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे उद्घाटन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रो. डॉ. बाबासाहेब बंडगर, प्रा.डाॅ. यशपाल भिंगे डाॅ. प्रसाद कारंडे, चोपडा डाॅ. नरेंद्र शिरसाठ आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना कुलगुरू प्रो. डाॅ. प्रकाश महानवर यांनी सध्याचा काळ हा उच्चशिक्षितांनी सक्रिय भूमिका घेण्याचा काळ असून प्राध्यापकांनी कृतिशील विचारवंत असले पाहिजे व सामाजिक प्रश्नांविषयी सक्रिय भूमिका घेतली पाहिजे असे सांगितले. धनगर प्राध्यापक महासंघाने ‘धनगर समाजाची थिंक टँक’ म्हणून सुरू केलेल्या कार्याचा त्यांनी गौरव केला. धनगर प्राध्यापक महासंघाने धनगर समाजातील सर्वच उच्चशिक्षित उद्योजक, डाॅक्टर, इंजिनिअर, वकील, शिक्षक अशा घटकांनाही आपल्या या कार्यात सामावून घ्यावे व समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचावे म्हणजे समाज प्रबोधनातून समाजोन्नती चे कार्य सफल होईल असे मार्गदर्शनही त्यांनी केले.
आपल्या उद्घाटनपर भाषणात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रो. डाॅ. बाबासाहेब बंडगर यांनी शिक्षणाच्या व गुणवत्तेच्या बळावरच आपणास मेंढपाळाचा मुलगा ते आंतरराष्ट्रीय दर्जाचा शास्त्रज्ञ व भारतातील धनगर समाजातील पहिला कुलगुरू होता आले असे सांगून धनगर प्राध्यापकांनी गुणवत्तापूर्ण संशोधनावर भर द्यावा असे सांगितले. शिक्षणासाठी व कुलगुरू म्हणून आपण जगातील अनेक देशात भ्रमंती केली, परदेशात शिक्षकांना पहिले स्थान आहे मात्र भारतात शिक्षकांना शेवटचे स्थान दिले जाते आहे अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
प्रा.डाॅ. यशपाल भिंगे यांनी आपल्या बीजभाषणात धनगर समाजातील उच्चशिक्षित एकत्र आले, समाज प्रबोधन करायला लागले, आपल्या जातीबांधवांच्या मागसलेपणाविषयी, त्यांच्या प्रश्नांविषयी बोलायला लागले की, प्रस्थापित समाजातील काही लोक आपल्यावर हे जातीयवादी आहेत असा शिक्का मारतात. मात्र आपल्या जातीतील अशिक्षीत, मागास, वंचितांना जागृत करणे, त्यांचे समाज प्रबोधन करणे, त्यांच्या हक्कासाठी लढणे, स्वतःच्या हक्कासाठी लढणे हे जातीतील उच्चशिक्षितांचे कर्तव्यच असल्याचे ते म्हणाले. झुंडशाही आणि गुंडशाहीच्या जोरावर इतरांवर अन्याय झाला तरी चालेल पण आपले तेच खरे करण्यासाठी सरकारवर दबाव टाकणारे लोकच खरे जातीयवादी आहेत असेही ते म्हणाले. धनगर, मेंढपाळ, पशुपालक हेच या देशातील नव्हे नव्हे तर जगातील आदिम जमात आहे. ज्यांना आपल्या मुळांचा शोध घ्यायचा असतो त्यांना धनगर जमातीचा, धनगरांच्या परंपरांचा अभ्यास करावाच लागतो असेही त्यांनी सांगितले.
डाॅ. प्रसाद कारंडे यांनी सुशिक्षित धनगरांनी एकत्र येऊन आपल्या जातीतील समाजबांधवांच्या उन्नतीसाठी कार्य करणे ही देशसेवाच असल्याचे सांगितले. डाॅ. नरेंद्र शिरसाठ (चोपडा) यांनी संघटनेचे महत्त्व व सुशिक्षित धनगरांचे सामाजिक भान यासंदर्भात मार्गदर्शन केले.
या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष व धनगर प्राध्यापक महासंघाचे अध्यक्ष प्रा. विजय शिरसाठ (चाळीसगाव) यांनी एसटी आरक्षणाची मागणी करणा-या धनगर समाजाला एन.टी. चे मिळालेले साडेतीन टक्के आरक्षणही प्रस्थापितांनी मिळू दिले नाही. लहान संवर्गांवर आरक्षणाच्या अंमलबजावणीत नेहमीच अन्याय झाला. हा मोठा आरक्षण घोटाळा आहे असे सांगितले. धनगर प्राध्यापक महासंघाने आजवर समाजप्रबोधन व्याख्यानमालांमधून केलेल्या समाजजागृतीच्या कार्याचा आढावाही त्यांनी घेतला. धनगर प्राध्यापकांवर नोकरीच्या ठिकाणी होणा-या अन्यायावेळी व समाजातील इतरही घटकांवर होणा-या अन्यायावेळी धनगर प्राध्यापक महासंघ पाठीशी ठामपणे उभा राहतो असेही ते म्हणाले.
उद्घाटन सत्राचे प्रास्ताविक धनगर प्राध्यापक महासंघाचे उपाध्यक्ष डॉ. ज्ञानदेव काळे (सातारा) यांनी केले. उद्घाटन सत्रात राष्ट्रीय बेसबॉल खेळाडू व भारतीय संघाच्या कोच कु.अंकीता दडस यांना तसेच विविध विद्यापीठातील धनगर समाजातील सिनेट सदस्य, अभ्यासमंडळ सदस्य, उल्लेखनीय कार्य करणारे प्राध्यापक, संशोधक यांना गौरविण्यात आले.
अधिवेशनाच्या दुस-या सत्रात डाॅ. स्वर्णमाला म्हस्के यांनी ‘धनगर समाजातील महिलांची स्थिती-गती’ याविषयावर शोधनिबंध सादर केला. तर सत्राध्यक्ष डाॅ. संगिता पैकेकरी यांनी ‘आधुनिकता आणि धनगर समाजातील स्त्री’ या विषयावर अभ्यासपूर्ण मांडणी केली. तृतीय सत्रात डाॅ. बी.ए.आजगेकर यांनी ‘खपले देवाच्या नावाने-वारसा की अर्थशास्त्र’ या विषयानुषंगाने धनगर समाजाच्या आदिम परंपरा, चालीरीती, अंधश्रद्धा यावर शोधनिबंध सादर केला. सत्राध्यक्ष डाॅ. सुरेश शेलार यांनी ‘धनगरांच्या परंपरा समाजासाठी अडसर की वरदान’ या विषयावर प्रकाश टाकला. चौथ्या सत्रात उद्योजक प्रा. नरेश पाल (बिहार) यांनी मेंढीच्या लोकरीपासून बनवलेल्या विविध उत्पादनांचे वैद्यकीय उपचार (Woolpathy) यावर सादरीकरण केले. मेंढीच्या लोकरीपासून बनवलेले घोंगडीवर झोपल्याने हृद्यविकार होत नाही असेही संशोधन निष्कर्ष त्यांनी मांडले. सत्राध्यक्ष डाॅ. अनिल दडस (कोल्हापूर) यांनी धनगर समाजाचे अर्थशास्त्र, उद्योजकता विकास यासंदर्भात अभ्यासपूर्ण मांडणी केली. समारोप सत्राचे प्रमुख अतिथी म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी इंग्रजी विभाग प्रमुख डाॅ. बजरंग कोरडे व मुंबई विद्यापीठाचे इंग्रजी विभाग प्रमुख डाॅ. शिवाजीराव सरगर, डाॅ.दत्ता डांगे (पंढरपूर) व हेडाम या बहुचर्चित कादंबरीचे लेखक नागू वीरकर (कल्याण) हे उपस्थित होते. यावेळी बोलताना डाॅ. कोरडे व डाॅ. सरगर यांनी धनगरांची ज्ञानसंपदा या विषयावर अभ्यासपूर्ण मांडणी केली. रामास्वामी पेरियार यांचे वैचारिक लेखन, धनगर समाजातील संताच्या अध्यात्मिक लेखनापासून तर आधुनिक साहित्यातील ना.धो.महानोर ते नागू वीरकरांपर्यंत व अनेक प्राध्यापकांच्या संशोधन कार्याने ही ज्ञानसंपदा समृद्ध आहे. ती समाजासमोर आणण्याची आवश्यकता आहे. प्रस्थापितांनी बहुजनांच्या ज्ञानसंपदा व त्यांच्यातील गुणांचे दमन करून स्वतःच्या समाजातील लेखक, कवी, गीतकार, कलावंताना श्रेष्ठ व ज्ञानी म्हणून पुढे आणले असा आरोपही त्यांनी केला. डाॅ. दत्ता डांगे यांनी धनगरांच्या समृद्ध लोकसाहित्य परंपरांचा आढावा घेतला. धनगरांच्या लोकसाहित्यावर संशोधनासाठी खूप मोठा वाव असल्याचे त्यांनी सांगितले. लेखक नागू वीरकर यांनी हेडाम या कादंबरीच्या जडणघडणीचा प्रवास व पार्श्वभूमी यावर प्रकाश टाकला. समारोप सत्राचे अध्यक्ष डॉ. ज्ञानदेव काळे यांनी धनगर प्राध्यापक महासंघाच्या पहिल्याच राष्ट्रीय अधिवेशनात धनगर समाजाचा वारसा व स्थिती गती या विषयानुषंगाने भरीव चर्चा झाल्याचे समाधान व्यक्त करत हे राष्ट्रीय अधिवेशन यशस्वी झाल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. चंद्रकांत कोळेकर (अधिसभा सदस्य, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर), श्री गजानन निळे (मल्हार सेना जिल्हाध्यक्ष, जळगाव) यांचीही विशेष उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुनील धनगर यांनी केले. प्रमुख अतिथींचा परिचय धनगर प्राध्यापक महासंघाचे सहसचिव डॉ. धनराज धनगर (येवला) यांनी करून दिला. तर आभार डॉ. अतुल सूर्यवंशी (पाचोरा) यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री रवी रावते, प्रा. रत्नमाला वाघमोडे, प्रा. श्रीपाद महात्मे, प्रा. संजय बनकर, प्रा. विजया पिंजारी, डाॅ. शिवाजी कुलाल, प्रा. रामदास सोन्नर, प्रा. सुचित्रा रत्नपारखी, डाॅ. पिराजी डुमनर, डाॅ. संगीता चित्रकोटी, डाॅ. जगतराव धनगर, प्राचार्या अर्चना नागे, प्रा. कोमल देवकाते, डाॅ. स्वाती सोनवणे (येवला) यांचे सहकार्य लाभले.