अमरावती : धनगर समाजातील तरूण बेरोजगाराना केंद्र पुरस्कृत ५० टक्के अनुदान योजनेमध्ये, धनगर समाजासाठी आदिवासी योजनांच्या धरतीवर राबविण्यात येणाऱ्या १००० कोटी रुपयांच्या योजनेमधून २५ टक्के अतिरिक्त धनगर समाजातील तरूण बेरोजगाराना अनुदान उपलब्ध करून देण्याची मागणी मेंढपाळ धनगर विकास मंचचे अध्यक्ष संतोष महात्मे यांनी मुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री मा. ना. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री मा. ना. अजितदादा पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
केंद्र पुरस्कृत योजनेमध्ये नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन (NLM) ही योजना मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे. या योजने मधून दुधाळ जनावरे, शेळी व मेंढी तथा कुक्कुटपालन इत्यादी योजने करिता ५० % अनुदान देण्यात येते. धनगर समाजाचा पारंपरिक व्यवसाय शेळी व मेंढी पालन असून या व्यवसायातील विविध समस्येमुळे व शासनाच्या उदासीन धोरणामुळे सदर व्यवसाय करण्यास तरुण वर्ग तयार होत नाही. त्यामुळे धनगर समाजात बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. केंद्र पुरस्कृत एन एल एम योजने अंतर्गत सहभागी होण्याकरिता ५० % अनुदान असून उर्वरित स्वनिधी अथवा बँक कर्जा मधून रक्कम उभी करावयाची आहे.
धनगर समाजातील तरुण शेळी मेंढीपालक व लहान शेतकरी असून अत्यंत गरीब आहे. योजनेत सहभागी होण्याकरिता स्वतः जवळ रक्कम उपलब्ध नाही. कर्जामुळे त्यांचे बँकेतील सिबिल अत्यंत कमी आहे. करिता बँक कर्ज पुरवठा करण्यास नकार देते. या योजनेमध्ये सहभागी होण्याकरिता ही मोठी अडचण येत आहे.
धनगर समाजाच्या उत्थानासाठी आदिवासी विभागाच्या योजनांच्या धर्तीवर योजना राबविण्याकरिता १००० कोटी रुपयांची योजना राबवून निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. इतर मागासवर्गीय विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सदर १००० कोटीच्या योजनेमधून केंद्र पुरस्कृत एन एल एम योजनेमध्ये राज्य सरकारच्या वतीने अतिरिक्त २५ टक्के अनुदान देण्यात यावे. जेणेकरून धनगर समाजातील बेरोजगार युवकांना या योजनेचा लाभ घेऊन आपला पारंपरिक व्यवसाय करणे करीता संधी प्राप्त होईल व मेंढपाळ धनगरांची भटकंती थांबवून ह्या योजने मुळे शेळी मेंढी व्यवसाय अर्धबंदिस्त होऊन त्यांच्या मुलांना शिक्षण ,आरोग्य मिळाल्यास हा वर्ग मुख्यप्रवाहात येऊ शकतो. असे या निवेदनात म्हटले आहे.