बीड : राज्य सरकार वारंवार धनगर समाजाच्या आरक्षण अंमलबजावणी प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे धनगर समाज आक्रमक झाला असून 22 फेब्रुवारी रोजी चौंडीहून मुंबईकडे धनगर आरक्षण दिंडी काढणार असल्याची माहिती यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोलतोडे यांनी पत्रकार परिषदमध्ये दिली. याकरिता बीडमध्ये ११ फेब्रुवारीला इशारा मेळावा घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.
राज्य सरकारने धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत शिंदे समिती नेमली. मात्र समिती स्थापन होवून एक महिना लोटला असला तरी अजून पर्यंत शिंदे समितीने राज्य सरकारला आपला अहवाल सादर केला नाही. केवळ दोनच राज्याचा दौरा केल्यामुळे सरकारबाबत शंका व्यक्त करण्यात आली आहे.
११ फेब्रुवारीच्या इशारा मेळाव्यांपर्यंत जर सरकारने निर्णय दिला नाही तर १७ फेब्रुवारीला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या चौंडी या जन्मगावातून आरक्षण दिंडी मुंबईकडे काढण्यात येणार आहे. २२ फेब्रुवारीला मुंबई येथे पोहोचून आझाद मैदानावर आंदोलन केले जाणार असल्याचे जाहीर केले आहे.