माढा : राष्ट्रीय समाज पक्षाचे आ. महादेव जानकर यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून शरद पवार यांची धरलेला हात सोडून महायुतीतून परभणी लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढणार असल्याने महाविकास आघाडीकडून माढा मतदारसंघात धनगर समाजाला प्रतिनिधित्व देण्यासाठी योग्य उमेदवाराचा शोध सुरू असल्याचे विधान ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले होते. पण अजूनही त्यांचा शोध संपलेला दिसून येत आहे.
यापार्श्वभुमीवर भक्कम वैचारिक आणि विश्वासार्ह भुमिका घेऊन भाजपमुक्त माढा करण्यासाठी उपेक्षितांचा आवाज म्हणून स्वरूप जानकर यांनी माढा लोकसभा लढणार असल्याचे जाहीर केले आहे. तर त्यांच्या राजकीय विचारांवर फुले- शाहू- आंबेडकर- कांशीराम यांचा प्रभाव असल्याने पक्ष की अपक्ष, याचा निर्णय आंबेडकर जयंतीदिनी १४ एप्रिलला घेणार आहे. त्याचदिवशी उमेदवारी अर्ज भरण्याबाबतची माहिती दिली जाणार आहे.
सामाजिक न्यायाच्या भुमिकेतून विचार केला तर या ६० वर्षात महाराष्ट्रातून एकही धनगर खासदार लोकसभेला निवडून गेलेला नाही. राज्याचा विचार केला तर धनगर समाजाची सर्वाधिक संख्या माढ्यात आहे. त्याबरोबर सत्तेच्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या समूहाची मतदारसंख्या १० लाखाच्या जवळपास आहे. त्यामुळे खरंच माढ्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून शरद पवार धनगर उमेदवाराला संधी देतात का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
कोण आहेत स्वरूप जानकर ?
माजी मंत्री व विद्यमान आमदार तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांचे ते पुतणे आहेत. गेली वीस वर्षांहून अधिक काळ पत्रकारिता केली आहे तर त्यांच्यावर फुले- शाहू- आंबेडकर- कांशीराम यांचा प्रभाव आहे. ते आता राजकारणात सक्रिय होत असल्याचे दिसून येत आहे.
गेल्या दहा वर्षांत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने देशात भीतीचे वातावरण तयार केले आहे. लोकशाही मोडीत काढून हुकुमशाहीच्या दिशेने वेगवान पावले टाकली जात आहेत. प्रसारमाध्यमांची उघडउघड गळचेपी सुरू असताना न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य धोक्यात आणले गेले आहे. यापार्श्वभुमीवर प्रत्येक लोकशाहीप्रेमी नागरिकाने आपली योग्य भुमिका निभावणे गरजेचे आहे. त्यात पत्रकार म्हणून तर अधिकची जबाबदारी आहे. म्हणूनच प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेत सहभागी होऊन भाजपला रोखण्यासाठी माढा मतदारसंघातील जनतेला आवाहन करायचे ठरवले आहे.
सांविधानिक मूल्यांच्या रक्षणाची भुमिका मांडण्याबरोबरच मतदारसंघातील महत्वाचे प्रश्न सोडविण्याचे अभिवचन जनतेला देणार आहे. विकासाच्या प्रक्रियेत मागे राहिलेल्या शोषित – वंचित घटकांचा आवाज बनण्याचा प्रयत्न यानिमित्ताने करणार आहे. राज्यातील जातीय संघर्षाच्या पार्श्वभुमीवर बहुजन एकतेचा विचार घेऊन मतदारसंघात पोहचणार आहेत.
माढा लोकसभा मतदारसंघातील सहाही आमदार आणि दुसऱ्या फळीतील ९० टक्के पुढारी भाजपच्या बाजूने आहेत, मात्र जनता भाजपच्या विरोधात आहे. भाजप सरकारने यापुर्वीच दोन साखर कारखानदार असलेल्या आमदारांना आयटी, ईडीची भीती दाखवून वळवले आहे. माण आणि फलटण मतदारसंघातील दोघांवर ईडीने कारवाई केली आहे. त्यातील एक नेता तर अनुसुचित जातीतला असे त्यांनी निवेदना द्वारे जाहीर केले आहे.