अमरावती: मेघालय राज्याचे राज्यपाल तथा धनगर समाजाचे कर्नाटक राज्यातील ज्येष्ठ नेते महामहीम मा. चंद्रशेखर एच विजयशंकरजी यांनी मेंढपाळ धनगरांच्या जंगलातील राहुटीवर प्रत्यक्ष भेट दिली. मेंढपाळ धनगरांच्या समस्या त्यांच्या वाड्यावर जाऊन समजून घेतल्या. मेंढपाळ धनगर बांधवांशी प्रत्यक्ष संवाद साधला. तसेच त्यांच्यासोबतच जेवणं केले. त्यामुळे संपूर्ण राज्यात सद्या याबाबत जोरदार चर्चा चालू आहे.
यावेळी महामहिम राज्यपाल यांनी महाराष्ट्रातील भटकंती करणाऱ्या मेंढपाळ धनगरांच्या ज्वलंत प्रश्नाविषयी बैठक घेतली. आपल्या शेळीमेंढीच्या पालनपोषणाकरिता सतत भटकंती करणारा मेंढपाळ धनगर समुदाय आहे. वनविभागाच्या नवनवीन जाचक नियमामुळे वनक्षेत्रातील त्यांच्या अधिवासावर प्रतिबंध आलेला आहे. मेंढपाळ समुदायाची सर्वात मोठी समस्या ही चराईक्षेत्राची आहे. विशेषतः पावसाळ्यात आपल्या पशूंना घेऊन जंगलाच्या कडेने, पायथ्याशी त्यांना राहूटी करून रहावे लागते.
यावेळी त्यांचा प्रशासनासोबत विशेषता वनविभाग, महसूल विभाग व पोलीस विभाग यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात संघर्ष होतो. यावेळी त्यांना प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर त्रास दिला जातो. आर्थिक नुकसानी सोबत प्रसंगी जीवित हानी सुद्धा होते. चाऱ्याची कमतरता, आरोग्य विषयक सोयी सुविधा उपलब्ध नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात त्यांचा पशुचे मृत्यू होतात. सतत भटकंती करीत असल्यामुळे त्यांच्यामध्ये शिक्षणाचा अभाव आहे. त्यामुळेच आरोग्यासोबत इतर सामाजिक प्रश्न सुद्धा आहेत.
या भटकंती करणाऱ्या मेंढपाळ समुदायाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, या संघर्षातून मार्ग काढण्यासाठी त्यांच्या जीवनात स्थैर्य देण्याच्या दिशेने मेंढ्यांच्या चराई व उदरनिर्वाहबाबत चिरकाल टिकाऊ उपयोजना करण्याकरिता मेंढपाळ धनगर विकास मंच ही संघटना मागील पंधरा वर्षापासून कार्यरत आहे. या अनुषंगाने राज्य सरकार व भारत सरकारकडे केलेल्या विनंतीवरून मेंढपाळ धनगरांचे प्रश्न समजून घेण्याकरिता मा. महामहीम राज्यपाल यांनी भेट दिली. यावेळी राज्यपाल यांनी वनविभाग व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन निर्देश दिले.
यावेळी त्यांच्यासोबत मा. पद्मश्री डॉ. विकास महात्मे साहेब, धनगर विकास मंच महाराष्ट्र राज्य चे अध्यक्ष संतोष महात्मे, धनगर माझा चे संपादक धनंजय तानले, जानराव कोकरे, हरिभाऊ शिंदे, शरद शिंदे, मंगेश शिंदे, तुकाराम यमगर, ज्ञानेश्वर परदेशी, विठ्ठल मारनर, सचिन मार्तंड, माणिकराव लोहगावे, इत्यादी मेंढपाळ धनगर विकास मंचाचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यानंतर मांगीलाल प्लॉट येथे आयोजित कार्यक्रमांमध्ये धनगर समाज संघर्ष समितीचे महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी यांचे समवेत धनगर समाजातील विविध प्रश्नाविषयी चर्चा केली.