पुणे : धनगर समाजाच्या हक्काच्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणी तत्काल अंमलबजावणी करावी . यासाठी ९ सप्टेंबर पासून पंढरपूर येथील टिळक स्मारक मैदानात व लातूर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात धनगर समाजाच्या युवकांनी आमरण उपोषण चालू केले आहे.
गेल्या अनेक वर्षापासून धनगर समाज सनदशीर मार्गाने आरक्षण अंमलबजावणीची मागणी करत आहे. परंतु प्रत्येक सरकारने आश्वासनापलीकडे काही दिले नाही. त्यामुळे धनगर जमातीमध्ये प्रचंड असंतोष पसरलेला आहे. विद्यमान राज्य सरकारने आता तरी तत्काळ आरक्षण अंमलबजावणीचा अध्यादेश काढावा अन्यथा सत्तेतून खाली खेचू असा इशारा देत उपोषण सुरू केले आहे.
पंढरपूर येथे धनगर समाजाच्या पाच जणांनी उपोषण सुरू केले आहे. यामध्ये राहुरी येथील विजय तमनर, जालना येथील दीपक बोराडे, पंढरपूरचे माउली हळणवर, पुणे येथील योगेश धरम, सातारा येथील गणेश केसकर, यांचा समावेश आहे.
तर लातूर येथे चंद्रकांत हजारे, अनिल गोयकर यानी आमरण उपोषणास सुरुवात केली.
या आंदोलनात धाराशीव, सोलापूर, मुंबई, पुणे, नागपूर, धुळे, छत्रपती संभाजीनगर, सांगली, सातारा, अकोला, अहिल्यानगरसह राज्यातील सर्व जिल्ह्यांतून धनगर बांधव भेटी देत असून या आंदोलनाची तीव्रता लवकरच राज्यात पोहचणार असल्याचे दिसून येत आहे.
ऐन सणासुदीच्या काळात धनगर समाजाने आंदोलन सुरू केल्यामुळे सरकारबरोबर सर्वसामान्यांना याची झळ नक्कीच बसणार असल्याचे दिसून येत आहे.