मुंबई : मुंबई हायकोर्टात सध्या चालू असलेल्या आरक्षणाच्या याचिका आज हायकोर्टाने फेटाळल्या त्यामुळे एकूणच धनगर समाजाला धक्का बसला आहे. तब्बल ७५ पेक्षा जास्त तारखा नंतर हा अनपेक्षित निकाल कोर्टाने दिला आहे. या याचिकेच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र धनगर समाजाला मोठा धक्का बसला आहे. आज सकाळी जवळपास ११ वाजल्यापासून अंतिम निकाल वाचन चालू होते. दुपारी ४.३० च्या सुमारास निकाल जाहिर केला. सदर निर्णय जस्टीस पटेल आणि जस्टीस कमल खटा यांच्या खंडपीठाने दिला आहे. निर्णय देताना सांगण्यात आले आहे की, अशा आरक्षणाच्या मुद्द्यावर आम्हाला हस्तक्षेप करता येणार नाही, धनगर समाजाला एसटीमधून आरक्षण देण्याचा आम्हाला अधिकार नाही. हा सर्वस्वी अधिकार संसद आणि संसदमंडळाचा आहे. कायद्यात दुरुस्ती करत संसदेतूनच हे आरक्षण दिलं जाऊ शकतं. असं म्हणत एसटीमधून आरक्षण देण्यासंबंधीत सर्व याचिका हायकोर्टाने फेटाळल्या आहेत. हायकोर्टाच्या या निर्णयानंतर धनगर समाज याचिकाकर्ते पुढे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
या सुनावणीच्यावेळी कोर्टात राज्यातून धनगर समाजाचे प्रमुख नेते, कार्यकर्ते उपस्थित होते. यामध्ये मा. खा. विकास महात्मे, आ. गोपीचंद पडळकर, आ. झिरवळ, मा. प्रकाश शेंडगे, मा. आ. रमेश शेंडगे, न्यायालयीन लढ्याचे प्रमुख मधू शिंदे, जे पी बघेल, ऍड पाचपोळ, सुधाकर शेळके, ऍड. अण्णाराव पाटील, हेमंत पाटील, विक्रम ढोणे, धनगर माझाचे धनंजय तानले, भीमराव सातपुते, यांचा समावेश होता.