फलटण : माढा लोकसभेच्या जागेवरून महायुतीतील भाजप व राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यात रस्सीखेच सुरू असतानाच महायुतीतील एकेकाळचा घटकपक्ष असलेल्या राष्ट्रीय समाजपक्षानेही भाजपच्या विरोधात दंड थोपटून शड्डू ठोकला आहे. माढ्यात भाजप विरुद्ध रासप अशीच लढत होणार असून फसवणूक करणाऱ्या भाजपला धडा शिकवा, असा एल्गार रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी पुकारला आहे. फलटण येथील रासपच्या माढा विजय निर्धार मेळाव्यात महादेव जानकर बोलत होते. यावेळी राज्याध्यक्ष काशिनाथ शेवते, सचिव माऊली सरगर, उपाध्यक्ष बबन वीरकर, प्रदेश सचिव रवींद्र कोठारी, भाऊसाहेब वाघ, वैशाली वीरकर, खंडेराव सरक उपस्थित होते.
पूर्वीची भाजप चांगली होती, कष्ट करणारी होती. आत्ताची भाजप मूळची भाजप राहिली नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी व अन्य पक्षांतील लोक भाजपमध्ये जबरदस्तीने घेतले जात आहेत. अशोक चव्हाण व इतर नेते भाजपमध्ये स्वखुशीने गेले नाहीत. त्यांना मजबुरीने जावे लागले. मजबुरीने जर त्यांना जावे लागले असेल, तर सामान्य जनता हुशार आहे. हीच सामान्य जनता तुमची मस्ती उतरवल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही जानकर यांनी दिला.
झालो तर मी खासदारच होईन. मी लढत राहिलो तरच सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय मिळत राहील, या भूमिकेतून मी काम करत राहणार आहे. मला कुठल्या पक्षाचे तिकीट मागायचे नाही, , असेही ते म्हणाले.