अहिल्यानगर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९९ व्या जयंतीनिमित्त येत्या ३१ मे रोजी चौंडी येथे विविध कार्यक्रम होणार आहेत. यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, पालकमंत्री राधाकृष्ण विखे, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, माजी मंत्री पंकजा मुंडे, आ. दत्तात्रय भरणे, आ. महादेव जानकर, आ. गोपीचंद पडळकर, यांच्यासह अनेक आजीमाजी आमदार, खासदार यांच्यासह अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमासाठी लाखोंच्या संख्येने उपस्थित रहावे. असे आवाहन विधान परिषदेचे आमदार व अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव समितीचे प्रमुख राम शिंदे यांनी केले आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती महोत्सव वर्षाला येत्या ३१ मेपासून सुरुवात होत राम शिंदे आहे. त्यांचे जन्मस्थळ असलेले चौंडी (ता. जामखेड) हे गाव राष्ट्रीय स्मारक होण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे, अशीही आ. राम शिंदे यांनी म्हटले आहे.
या जयंती महोत्सवानिमित्ताने आम्ही अहिल्याच्या लेकी-जागर नारी शक्तीचा… हा महिला कीर्तन महोत्सव २८ मे पासून चौंडीमध्ये चालू झाला असून ३१ मे रोजी जयंतीच्या दिवशी पहाटे महाअभिषेक, पालखी सोहळा व काल्याचे कीर्तन आणि महाप्रसाद वाटप होणार आहे. त्यानंतर पुढील वर्षी २०२५ मध्ये अहिल्यादेवी होळकर यांचा ३०० वा जयंती समारंभ होणार आहे. त्यामुळे या त्रिशताब्दी जयंती महोत्सव वर्षाची सुरुवात येत्या ३१ मे रोजी होणार आहे.