चौंडी : ‘धनगर समाजाच्या हक्काच्या ST आरक्षणाची अंमलबजावणी करावी’ या मागणीसाठी धनगर समाजाच्या वतीने चौंडी ते मुंबई धनगर आरक्षण दिंडीला सुरुवात होणार इतक्यात पोलीस प्रशासनाने फौज फाटा लावून परवानगी नाकारल्याचे सांगत धनगर आरक्षण दिंडीला रोखल्याने धनगर समाजामध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे.
२० फेब्रुवारी रोजी होणार्या महाराष्ट्र विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनात धनगर सामाजाच्या अनु.जमाती(एस टी.प्रवर्ग)च्या आरक्षणप्रश्नी तोडगा काढावा, या मागणीसाठी यशवंत सेना व सकल धनगर समाज यांच्या वतीने चौंडीहून मुंबईला निघालेल्या धनगर आरक्षण यात्रेला प्रशासनाने परवानगी नाकारली. या कृतीचा निषेध करीत धनगर बांधवांनी चौंडी येथेच सत्याग्रह आंदोलन सुरु केले. अशी माहिती यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांनी धनगर माझाशी बोलताना सांगितले.
दि. १६ फेब्रुवारी रोजी उच्च न्यायालयाने धनगर आरक्षणचा प्रश्न निकाली काढल्यानंतर समाजात प्रचंड नाराजी पसरली आहे. दरम्यान आज यशवंत सेनेच्या आरक्षण यात्रेला परवानगी नाकारल्याने राज्यातील महायुतीचे सरकार धनगर समाजाबाबत असंवेदनशील असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले असल्याचे दोडतले यांनी सांगितले. यावेळी यशवंत सेनेचे प्रा.माणिकराव दांगडे पाटील, अण्णासाहेब रुपनवर, गोविंद नरवटे,नितीन धायगुडे, किरण धालपे,दिलीप गडदे,अक्षय शिंदे, दत्ता काळे आदी उपस्थित होते.