धनगर समाज महासंघाचे संस्थापक, चौंडी विकासाचे शिल्पकार माजी मंत्री डॉ.आण्णासाहेब डांगे यांचा आज ८८ वा वाढदिवस साजरा करताना आपण सर्वजण उत्साहित झालो आहोत.
डॉ.अण्णासाहेब डांगे यांचा वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त करत असताना आम्हास गौरव वाटतो. 30 जून 1936 रोजी आषाढी एकादशी दिवशी आण्णासाहेब डांगे यांचा जन्म झाला. आण्णासाहेब डांगे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून आपल्या सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक कार्यास सुरुवात केली. सांगली जिल्ह्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य करणे सोपे नव्हते. तरीही जिद्दीने चिकाटीने संघाचे कार्य करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामाची व्याप्ती वाढवली. संघात जिल्हा पासून ते राष्ट्रीय पातळीवर कार्य करत असताना विविध पदे भूषविली.जनसंघ भारतीय जनता पक्ष यांच्या वतीने सांगलीत लोकसभा निवडणुका लढवून राजकीय वर्चस्व प्रस्थापित केले. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री वसंत दादा पाटील यांच्या विरोधात राजकीय संघर्ष करत आपला राजकीय दबदबा निर्माण केला. विधान सभेत आमदाराची संख्या अपुऱ्या असतानाही विधान परिषदेत निवडून येण्याची किमया साधली आणि भारतीय जनता पक्षाचे आमदार म्हणून 1984 मध्ये विधान परिषदेत दिमाखात प्रवेश केला. 1990 मध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून कार्य करताना राज्याच्या विविध प्रश्नावर चर्चा घडवून विरोधी पक्षनेते पदाचा गरिमा वाढवला. विरोधाला विरोध अशी भूमिका कधीही सभागृहात घेतली नाही. विरोधी पक्षनेते म्हणून कार्य करत असताना धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती आरक्षणाची अंमल बजावणी करावी यासाठी आंदोलने केली. 25/01/1990 रोजी धनगर समाजाचा भटक्या जमाती क प्रवर्गात समावेश करताना दोन दक्के आरक्षण देताना सहा महिने भटकणे ही अट लागू केली होती. ती रद्द करावी आणि सहा टक्के आरक्षण मिळावे यासाठी टक्कर मोर्चा कादून अट रद्द करून घेत साडेतीन टक्के आरक्षण मिळवून दिले हे धनगर समाजाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची कामगिरी होती.
भारतीय जनता पक्षात माधव ग्रूप प्रभावशाली करत अण्णासाहेब डांगे,गोपीनाथ मुंडे आणि ना.स.फरांदे यांनी भारतीय जनता पक्षाची पाळेमुळे खोलवर सर्वसामान्य जनतेत रुजवली. 1995 मध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेना युतीची सत्ता आणण्यात गोपीनाथ मुंडे यांच्या बरोबर आण्णासाहेब डांगे यांचा देखील सिंहाचा वाटा आहे. मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या मंत्री मंडळात ग्रामविकास,पाणीपुरवठा आणि स्वच्छता,विमुक्त जाती भटक्या जमाती,ओबीसी मंत्रालय अशी महत्त्वाची आठ मंत्रालयाचा कारभार समर्थपणे पार पाडताना प्रभावी मंत्री म्हणून प्रतिमा करताना शिस्तप्रिय मंत्री म्हणून नावलौकिक मिळविला. 1995 मध्ये अण्णासाहेब डांगे यांनी महेश्वर ते चौंडी अशी अहिल्या संदेश यात्रा काढण्यात महत्वाची भूमिका बजावली. याच काळात मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या हस्ते चौंडी विकास प्रकल्पाचे उदघाटन करून आज चौंडीत अहिल्या सृष्टी उद्यान सभागृह बांधून चौंडी आज पर्यटन स्थळ म्हणून विकसित केले. महासंघाच्या वतीने धनगर समाज अनुसूचित जमाती प्रवर्ग मध्ये असून त्याची अंमलबजावणी करावी यासाठी अनेक आंदोलने केली.
न्यायमूर्ती वेंकट चलाय्या आयोगासमोर धनगर समाजाची कैफियत मांडली आणि न्यायमूर्ती वेंकट चालाय्या आयोगाने धनगर अशी दुरुस्ती केली याचे सर्व श्रेय अण्णासाहेब डांगे यांना अण्णासाहेब डांगे यांनी राजकीय कार्य करत असताना आष्टा येथे दीनदयाळ उपाध्याय सुत मिल सुरू करून राज्यात नामवंत सुत मिल म्हणून प्रसिद्ध होत सहकार क्षेत्रात देखील ठसा उमटवला. आष्टा येथे संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्था माध्यमातून अभियांत्रिकी,वैद्यकीय शिक्षण सुरू करून धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी करून दिली. अनेक माध्यमिक प्राथमिक शाळेच्या माध्यमातून ज्ञानदानाचे कार्य करत आहेत.धार्मिक, शैक्षणिक,सांस्कृतिक ,सामाजिक राजकीय अशा सर्व बाजूने चौफेर कार्य करणारे डॉ.अण्णासाहेब डांगे यांना उद्दंड दीर्घायुष्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना करत असताना अण्णासाहेब डांगे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
प्रा.देवेंद्र विठ्ठल मदने सोलापूर