सोलापूर : सोलापुरात २४ व २५ फेब्रुवारी रोजी संत सद्गुरू बाळूमामा मंदिर, विजापूर हायवे बेलाटी (ता. उत्तर सोलापूर) येथे दोन दिवसीय आदिवासी धनगर साहित्य संमेलन होणार असल्याचे संयोजन समितीच्या वतीने सोलापूर येथे पत्रकार परिषदेत जाहिर करण्यात आले आहे. यावेळी धनगर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष साहित्यिक तथा माजी आमदार अॅड. रामहरी रुपनवर, स्वागताध्यक्ष श्रीराम पाटील, साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. अभिमन्यू टकले यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.
या दोन दिवसात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले असून श्रोत्यांना बौद्धिक मेजवानी व विचारांचे आदान प्रदान होणार असून शनिवार, २४ फेब्रुवारी रोजी सकाळी आठ ते ११.३० दरम्यान साहित्य दिंडी ने सुरुवात होणार आहे. या साहित्य स्थळाला संत बाळूमामा नगरी असे नाव दिले आहे. तर ग्रंथ विभागाला श्री संत कनकदास ग्रंथ नगरी असे नाव दिले आहे तर विचारपीठाला श्री सिद्धेश्वर महाराज विचारपीठ असे नाव दिले आहे.
सदर संमेलनाला माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आ. राम शिंदे, आ. विजय देशमुख, आ. सुभाष देशमुख, आ. दत्तात्रय भरणे, आ. राम शिंदे, आ. महादेव जानकर, आ. गोपीचंद पडळकर, आ. शिवसेना जिल्हाप्रमुख अजय दासरी याच्यासह ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, प्रख्यात लेखक इतिहास संशोधक पुणे संजय सोनवणी, सोशल पत्रकार राजा माने, राजस्थानचे घनश्याम होळकर, विजापूरचे प्रसिद्ध साहित्य पंडित चंद्रकांत बिदरगे गुरुजी, डॉ. मुरहरी केळे, डॉ. श्रीमंत कोकाटे, कुलगुरू डॉ प्रकाश महानवर, सुभाष बोंद्रे, प्रा. डॉ. यशपाल भिंगे सह अनेक आजी माजी आमदार, विविध संघटनांचे पदाधिकारी सह दिग्गज मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या दोन दिवसात कवि संमेलन, विविध विषयावर परिसंवाद, संस्कृतिक कार्यक्रम, पुरस्कार वितरण सोहळा आदि कार्यक्रमांचा समावेश आहे.
धनगर समाजातील अनेक रूढी, परंपरा, ओव्या, संस्कृती यांचे संवर्धन आणि प्रचार व्हावा या उद्देशातून हे संमेलन आयोजित केले आहे. धनगर समाजाचा इतिहास सर्वांपुढे यावा यासाठी या संमेलनात विविध प्रश्न आणि मुद्द्यांवर चर्चा तसेच ठराव करण्यात येणार आहेत असे संमेलनाचे अध्यक्ष तथा माजी आमदार अॅडव्होकेट रामहरी रुपनवर यांनी यावेळी सांगितले.