मुंबई – मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी काढलेल्या अध्यादेशाविरुद्ध राज्यातील ओबीसी समाज आणि नेते एकटले आहेत. मराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी समाजाकडून राज्यात १ फेब्रुवारीपासून राज्यातील सर्व आमदार, खासदार, तहसीलदार यांच्या घरासमोर आंदोलन केले जाणार आहेत तर ३ फेब्रुवारी रोजी नगर येथे राज्यव्यापी ओबीसी एल्गार मेळावा आयोजित करण्यात येणार आहे असल्याची माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. २८ जानेवारी रोजी झालेल्या बैठकीत ठरविण्यात आले आहे. तेव्हा आता १ फेब्रुवारी रोजी राज्यातील ओबीसी समाजाने रस्त्यावर उतरून आंदोलन करावे असेही आवाहन केले आहे.
राज्य सरकारने मनोज जरांगे यांच्या आंदोलांनासमोर नमते घेत त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत असे असतानाच दुसरीकडे ओबीसींवर अन्याय होत असल्याने ओबीसी नेत्यांकडून याच पार्श्वभूमीवर राज्यातील ओबीसी नेत्यांची बैठक रविवारी २८ जानेवारी मंत्री छगन भुजबळ यांच्या मुंबई येथील शासकीय निवासस्थानी पार पडली. या बैठकीत तीन ठराव संमत करण्यात आले.
१ फेब्रुवारीपासून राज्यात ओबीसींनी आंदोलन करावं असेही आवाहन मंत्री छगन भुजबळ यांनी केलं आहे. त्याचबरोबर मराठवाड्यातून सुरुवात करत संपूर्ण राज्यात ओबीसींची एल्गार यात्रा काढली जाणार आहे अशी माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
ओबीसी आरक्षणात वाटेकरी घुसवण्याचे उद्योग थांबवा – भुजबळ
मराठय़ांना आरक्षण द्यायला आमचा विरोध नाही. त्यांना ओबीसीच्या कोटय़ाबाहेर आरक्षण द्या. पण त्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी आरक्षणात वाटेकरी घुसविण्याचे उद्योग थांबवा एवढीच आमची भूमिका आहे, असे मंत्री छगन भुजबळ म्हणाले. ओबीसी आरक्षणाची लढाई सरकारमध्ये राहून लढणार की बाहेर पडून लढणार, असा प्रश्न छगन विचारण्यात आला. यावर भुजबळ म्हणाले, ते माझ्या पक्षाने ठरवावे. मुख्यमंत्र्यांनी ठरवावे. मला त्याची काही चिंता नाही. ओबीसी प्रश्नाचे दुःख आणि संताप आहे. मी एकटा नाही. माझ्या मागे ओबीसी समाज आहे. लाखो लोक आहेत. ओबीसी बांधवांचे, भटक्यांचे कित्येक वर्षानी मिळणारे आरक्षण समाप्त होत आहे, याची आग मनात भडकत आहे, असे भुजबळ म्हणाले.