मुंबई : राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली मुलं स्पर्धेत टिकवायची असतील तर त्यांना दर्जेदार शिक्षण देणे हे काळाची गरज आहे तरी पाल्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न सर्वांनी करावा असे आवाहन मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी केले. चेंबुर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी सेवा संघाच्या १९ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून मुंबई महानगरपालिकेचे माजी उपायुक्त लक्ष्मणराव व्हटकर तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार रमेश भाऊ शेंडगे, मुक्या अभियंता पांडुरंग बंडगर, सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे, श्री. मुरारजी पाचपोळ, डॉ. उत्तम कोळेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी मुंबई महानगरपालिकेतील अधिकारी कर्मचारी यांनी स्थापन केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी सेवा संघाच्या वतीने १९ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी, स्व. शिवाजीराव ( बापु) शेंडगे यांची पुण्यतिथी, वधु-वर पालक परिचय मेळावा तसेच समाजातील गुणवंत मान्यवरांचा सत्कार सोहळा अशा संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्यांचा उपस्थितांच्या हस्ते सन्मान केला.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे मधुकर गडदे, संपत पाटील, महावीर बनगर, राजेंद्र कराडे, संग्राम पाटील, सुभाष येळे, राज बंडगर सह आदि पदाधिकार्यांनी प्रयत्न केले.