नगर : चिकाटी, जिद्द व कष्टातून उभा राहिलेला व्यावसाय चिरकाल नावारूपास राहतो. गरिबीतून श्रीमंतीचा प्रवास करताना झालेल्या प्रत्येक मदतीची आठवण ठेऊन व्यक्त केलेली कृतज्ञता तागड परिवाराला यशाच्या शिखरावर घेऊन गेली असल्याचे सांगत त्यांची कार्यपद्धती व्यावसायात पाऊल ठेवणा-या युवकांसाठी प्रेरणादायक आहे असे गौरवद्गार आ. शंकरराव गडाख यांनी काढले.
खरवंडी येथील रस्त्याच्या बाजुला सुसज्ज पध्दतीने नूतनीकरण केलेल्या राजलक्ष्मी मंगल कार्यालयाचे उदघाटन आमदार शंकरराव गडाख व महंत उध्दव महाराज मंडलिक यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते.

मंगल कार्यालयाचे संचालक सुदामराव तागड यांनी प्रास्ताविक भाषणात तिनशे रुपायाच्या भांडवलावर आज पर्यंत झालेला प्रवास सांगताना सर्व मदतीच्या हातांचा नामोल्लेख केला. जिल्हा परिषद शिक्षक चंद्रकांत आघाव यांचा विशेष उल्लेख करीत टेकडी नावाचे पुस्तक लिहत असल्याचे सांगितले. उध्दव महाराज यांनी आपल्या शुभेच्छा भाषणात तागड यांनी कष्टात सातत्य ठेवून एकप्रकारे यशाची तपश्चर्या केली असल्याचे सांगून कृतज्ञता व्यक्त करणे आजकाल दुरापास्त झाले असताना त्यांनी ठेवलेली आठवण हीच त्यांची खरी श्रीमंती असल्याचे सांगितले.
सदर कार्यक्रमाला नगर, शेवगाव, नेवासा, सोनई, सह जिल्हा व परिसरातून विविध क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित होते.

