धनगर समाजाच्या सामाजिक चळवळीमध्ये समाजाचा इतिहास व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारांचा माहितीपट सांगून पुढील पिढीला प्रेरणा देण्याचा प्रयत्न सामाजिक चळवळीतील अनेकजण करताना आपण नेहमीच पहात आहोत. पण धनगर समाजातील एक, दोन चळवळीतील अभ्यासक सोडले तर अनेकांना एक व्यक्तिमत्व माहितच नाही तसेच त्याबद्दल कुठेही बोलल जात नाही, त्यांच्याबद्दल सहसा लिहलेले आढळले नाही. विशेष म्हणजे ते व्यक्तिमत्व साधे सुधे नसून मराठवड्यातील धनगर समाजातील पहिले आमदार होते. ते म्हणजे कै. मा. आमदार अँड यमाजी सातपुते.
कै. मा. आमदार अँड. यमाजी सातपुते यांचा जन्म छ्त्रपती संभाजी नगर ( औरंगाबाद ) जिल्ह्यातील तालुका गंगापूर येथे १९०२ मध्ये झाला. त्यांच्या घरची परस्थिती बेताचीच. अतिशय खडतर अशा परिस्थितीतून त्यांनी आपले एल.एल.बी चे शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण करत असतानाच त्यांनी सामाजिक कार्याला वाहून घेतले. वकिली व्यवसाय करत असतानाच त्याच काळात त्यांच्यावर महात्मा गांधीच्या विचारांना प्रभावित होऊन, अँड. यमाजी (दादा) सातपूते यांनी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला.
सामाजिक कार्यातील आवड, उपक्रम, कार्यक्रम व सामाजिक कार्याची निष्ठा पाहून त्याना पक्षाने फेब्रुवारी १९६२ मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी गंगापूर विधानसभा मतदार संघातून निवडणूइकीसाठी रिंगणात उतरवले. त्यावेळेस गंगापूर तालुका हा कम्युनिस्ट पार्टी या पक्षाचा बालेकिल्ला होता. या निवडणुकीत अँड. यमाजीराव (दादा) सातपूते यांनी १०००० पेक्षा जास्त लीड घेऊन भंडारा उधळला आणि केवळ गंगापूरचे नव्हे तर मराठवड्यातील धनगर समाजाचा पहिले आमदार होण्याचा मान मिळवला. तसेच गंगापूर शहरात नगरपरिषद मध्ये आपल्या पत्नी. सौ.शांताबाई यमाजीराव सातपुते यांना निवडून आणले व त्यांना गंगापूर शहराच्या पहिल्या नगराध्यक्षा होण्याचा मान मिळवून दिला.
राजकरणात पडल्यानंतर त्यांच्या मनाला कांही गोष्टी न पटल्यामुळे तसेच सामाजिक कार्याला व व्यवसायला न्याय देण्यासाठी त्यांनी पुढचे आमदारकीचे तिकीट नाकारले. व आपली वकिली आणि सामाजिक कार्यात काम करत राहिले. त्याच वेळी म्हणजे १९६९ मध्ये डेहराडून येथे झालेल्या अखिल भारतीय धनगर समाजाच्या अधिवेशनाचे अध्यक्षपदही अँड. यमाजी सातपुते यांनी भूषविले होते.
त्यांनी मेंढपाळांच्या विकासासाठी गंगापूर शहरात पहिला घोंगडी बनविण्याचा कारखाना सुरू केला होता. तसेच गंगापूर शहरातील साखर कारखाना व गंगापूर शहरातील महाविद्यालय मुक्तानंद यांच्या उभारणीसाठी ही त्यांचे मोलाचे योगदान होते. त्यांच्याच काळात गंगापूर शहरात कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना केली.
आज त्यांची पुढची पिढी छत्रपती संभाजीनगर शहरात अत्यंत साधेपणाचे म्हणजे मध्यमवर्गीय घटक म्हणून सरळ सरळ जीवन जगताना दिसून येत आहे. म्हणजेच आमदार साहेबांनी कसलाही भ्रष्टाचार न करता आमदारकीची ५ वर्षे प्रामाणिकपणाने मतदार संघातील जनतेची सेवा केली.
अशा या प्रेरणादायी व्यक्तिमत्वाची प्राणज्योत २९ /०३ /२००० रोजी मावळली.
संपादक – श्री. धनंजय तानले